अडकलाय पतंग साला,
लांब काडी घेऊन कुणीतरी काढा,
उडाला होता सर्र सर्र करत,
उंच उंच निळ्याभोर आकाशात,
मध्ये अचानक सरळ खाली येऊ लागला,
ती हसत होती कुण्या वेगळ्याच पतंगाला पाहून,
हे पाहून तिच्या गच्चीवरून यु टर्न मारू लागला,
परत वर सर्र सर्र,
थोडा रागावला,
अन दोन तीन पतंगावर धावला,
कापला त्यांचा मांजा,
दिली त्यांना मुक्ती,
आता काही काळ एकटा स्तब्ध उभा आकाशात,
खूप लांब, लांबच लांब, दूर दूर आकाशात एकटा, स्तब्ध,
दिसत होता बिंदू सारखा,
इतक्यात त्याच्या मालकाच्या पालकाची हाक आली,
"आयुष्यभर फक्त पतंगच उडवत बसा, म्हणजे झाल कल्याण आयुष्याच",
चाक्रीताला धागा संपायला आला होता,
पतंग दूर दूर दूरवर होता,
मालकाने उरलेला धागा सोडायला सुरवात केली,
पतंग अजून दूर दूर दूरवर जाऊ लागला,
स्वतः भोवतालीच गोल गोल गिरक्या घेऊ लागला,
गिरक्या प्रचंड वाढल्या,
मालकाच्या चाक्रीचा धागा संपला,
उरलं फक्त गाठ आणि चक्री,
मालकाने एकदा तिच्या गच्चीकडे पहिले मग पालकांच्या हाकेच्या दिशेने,
चक्री पासून धागा तोडला आणि आकशात पतंगाकडे बघून सोडला,
चक्री पूर्ण, पूर्ण , संपूर्ण ताकतीने दूर फेकून दिली,
पतंगा कडे न बघताच गच्चीच्या पायऱ्या उतरू लागला,
एकदा शर्टाच्या बाहीने जोर देऊन डोळे पुसले,
आणि घरात शिरला,
पतंग आकाशात भरकटल्या सारखा भटकत होता,
दिशा देणारा मालक नव्हता म्हणून,
अंग टाकून तरंगत होता,
शेवटी एका उंच खांबाच्या,
शेकडो तारांच्या जाळ्यात तो अडकला,
साला,
लांब काडी घेऊन कुणी तरी काढा....